भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...
प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे
पुणे रिसर्च टाईम्स
+91 - 9403981666 (व्हाट्सएप)
भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.
भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो. "वसुधैव कुटुम्बकम्" हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.
बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन काळी सूर्यवंशीय व चंद्रवंशीय क्षत्रिय राज्यकर्ते राज्य करत होते. ते त्यांच्या वंशाचे संबंध थेट राम व कृष्णा पर्यंत होते असे सांगत. सत्ययुगात श्रीरामाने रामराज्यात राजसूय यज्ञ केला असो वा द्वापारयुगामध्ये महाभारतात अर्जुन किरात व चिन या हिमालया पलिकडच्या प्रदेशात गेला होता असे उल्लेख आहेत व खुद्द महाभारत युध्दातही चिन व किरात चे सैनिक लढल्याचे उल्लेख आहेत.
जागतिक वर्तमान परिस्थितीच्या या पार्श्वभूमीवर चीनी ड्रॅगनची विस्तारवादी पावले जगासाठी धोकादायक ठरणारी आहेत.
१) 'चायनीज कृत्रिम कोरोना व्हायरस'
'चायनीज व्हायरस' अर्थात 'कोरोना व्हायरस' चा उगम चीन मध्ये होऊन तिथूनच जगभरात त्याचा प्रसार झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे. येत्या काही काळात हेही सिद्ध होईलच की हा अपघात नव्हता तर योजनाबद्ध रितीने घडवून आणलेलं षडयंत्र होतं. अमेरिका आणि युरोपसह कित्येक देश चीनच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करत आहेत. पण चीन त्यास विरोध करत आहे.
२) दक्षिण चीन समुद्रात कृत्रीम बेट
खनिज तेलाने समृद्ध असलेल्या दक्षिण चीन समुद्रात गेल्या काही वर्षांत चीनने कृत्रिम बेटांची निर्मिती करुन नाविक तळ उभारले. गेल्या महिन्यात दक्षिण चीन समुद्रातल्या वादग्रस्त बेटांसाठी चीनने नवीन गव्हर्नमेंट सिस्टीम लागू केली. त्यामुळे व्हिएतनाम, फिलिपिन्स हे शेजारी देश नाराज झाले आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी तीव्र निषेध नोंदवला. उत्तर चीनी समुद्र देखील तंग वातावरण अनुभवत आहे. चीन, उत्तर कोरिया एकीकडे आणि जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका दुसरीकडे अशी अवस्था तिथे आहे. दक्षिण कोरिया आणि जपानसह चीनजवळच्या अतिपूर्वेच्या कैक देशांना चीनची भीती वाटत आहे. यातल्या तैवानची स्थिती तर फारच बिकट झाली आहे. तैवानवर सैन्य पाठवून कोणत्याही क्षणी चीन त्याला स्वत:त विलीन करु शकतो. म्हणूनच ४-५ दिवसांपूर्वी अमेरिकेने दोन युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात नियुक्त केल्या आहेत. चायनाव्हायरस मुळे सगळ्या जगाचे लक्ष विचलित झालेले असताना चीनसाठी अनुकूल काळ निर्माण झाला आहे.
३) माऊंट एव्हरेस्ट वर दावा
काही दिवसांपूर्वी चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क (सीजीटीएन) ने एव्हरेस्ट शिखराचा फोटो टाकून ट्वीट केले : 'World's highest peak located in China's Tibet Autonomous Region.' त्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. शेवटी सीजीटीएन ला ट्वीट बदलावे लागले. पण त्या बदललेल्या ट्वीटची भाषा सुद्धा मासलेवाईक आहे. 'World's highest peak located on the China-Nepal border.'
४) किरगीझस्तानवर दावा
काही दिवसांपूर्वी चीनमधील दोन संकेतस्थळांवरच्या लेखांनी मध्य आशियातील किरगीझस्तान आणि कझाकस्तान वर चीनचा दावा सांगितला. Tuotiao.com या चिनी संकेतस्थळाचे ७५० मिलियन वाचक आहेत. सर्वाधिक कंटेट क्रिएशन करणारे हे चीनचे संकेतस्थळ आहे. त्याचे मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. अशा या संकेतस्थळावर काही दिवसांपूर्वी लेख प्रसिद्ध झाला. त्याचे शीर्षक होते - "स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किरगीझस्तान पुन्हा चीनकडे का परतला नाही?" त्या लेखात असे प्रतिपादन केले होते की खान डायनेस्टीच्या काळात किरगीझस्तानची ५,१०,००० चौ.कि.मी. येवढी जमीन म्हणजेच संपूर्ण किरगीझस्तान हा चीनचा अंकीत होता. पण नंतर रशियन साम्राज्याने हा प्रदेश बळकावला. मंगोलियाप्रमाणेच किरगीझस्तान देखील चीनचे अभिन्न अंग आहे असे त्या लेखात म्हटले आहे.
Sohu.com ही अशीच एक चीनची महत्वाची इंटरनेट कंपनी. हिचेही मुख्यालय बीजिंगलाच आहे. त्यात मध्यंतरी एक लेख प्रकाशित झाला. त्यात म्हटले होते की ऐतिहासिक दृष्ट्या कझाकस्तानची जमीन ही चीनचीच आहे. ह्या लेखामुळे चिनी राजदूत झँग झियाओ यांना १४ एप्रिल रोजी तातडीने कझाकस्तानने स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवून घेतले.
पण नाराजी प्रकट करणे, निषेध नोंदवणे यापलिकडे हे मध्य आशियायी देश काहीही करु शकत नाहीत हे चीनला माहीत आहे. या देशांच्या आर्थिक नाड्या चीनच्या हातात आहेत. चीनने पाचही मध्य आशियाई देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे.
५) प्रचंड आर्थिक कर्ज देणे
किरगीझस्तानच्या डोक्यावर चीनच्या एक्झिम बँकचे १.७ बिलियन डॉलर्स येवढे कर्ज आहे. म्हणजेच किरगीझस्तानवर असलेल्या एकूण परकीय कर्जाच्या ४३% कर्ज एकट्या चीनचे आहे. साहजिकच किरगीझस्तानची विदेशनीती चीनच्या दावणीला बांधली जात असेल तर आश्चर्य वाटायला नको. किरगीझस्तानमध्ये ऊर्जास्त्रोत मुबलक आहेत हेच चिनी गुंतवणुकीचे मुख्य कारण. मात्र व्यूहात्मक कारण देखील आहेच.
६) दुरदर्शी युद्ध रचना करणे
२०११ साली चीनने ताजिकीस्तान बरोबर असलेला सीमावाद सोडवला. त्यासाठी त्यांनी परस्परांच्या जमिनीच्या तुकड्यांची देवघेव केली. ताजिकीस्तानला चीनकडून मिळाली त्यापेक्षा खूप कमी जमीन चीनला ताजिकीस्तानकडून मिळाली. वास्तवात ताजिकीस्तानच्या वादग्रस्त अशा पामीरमधील २८,००० चौकिमी येवढ्या जमिनीवर चीन दावा सांगत होता. पण प्रत्यक्षात तो १००० चौकिमी जमीन घेऊन स्वस्थ बसला. ताजिकीस्तानसह जगाला तेव्हा आश्चर्य वाटले कारण वरवर पाहता स्वतः कडे पडती बाजू चीन कधीच घेत नाही. पण चीनचा त्या १००० चौकिमी मागचा कावा लोकांना आता लक्षात येत आहे. त्यांनी वखान कॉरिडॉरच्या उत्तरेकडचा ताजिकीस्तानच्या हद्दीतला जो तुकडा मिळवला त्यामुळे त्यांना वखान कॉरिडॉरवर व्यवस्थित लक्ष ठेवता येत आहे. हाताशी अमाप धनदौलत आणि आक्रमक सैन्य असूनसुद्धा जमिनीच्या बारक्या तुकड्यावर चीन संतुष्ट राहिला त्यामागे वखान कॉरिडॉर हेच कारण होते. त्याच आधारामुळे चीनला अफगाणिस्तानपर्यंत जोडणाऱ्या लष्करासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तयार करता आल्या.
७) नैसर्गिक साधनसंपत्ती वर डोळा
एकूणच मध्य आशिया हा खनिजांनी समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे चीनची असुरी भूक शमवायला तो ताब्यात असणे आवश्यक वाटते. कझाकस्तान, किरगीझस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनीस्तान, उजबेकीस्तान या पाचही देशांमध्ये तेल व नैसर्गिक वायू, सोने, चांदी, युरेनियम, हिरे, अॅल्यूमिनियम इत्यादींचे साठे आहेत. त्याजोडीला व्यूहात्मक महत्त्वही आहेच. म्हणून तर चीन त्यात शिरकाव करु पाहात आहे.
८) सिक्कीम (भारत) वर डोळा
हे सगळे चालू असतानाच काही दिवसांपूर्वी उत्तर सिक्कीम मधील नकू ला सेक्टर येथे भारतीय व चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाली. सीमेवर गस्त घालताना हा प्रसंग घडला. इथे हे लक्षात असू देत की सिक्कीम हा भारताचा बॉटल नेक किंवा चिकन नेक आहे. म्हणजे तो एकमात्र असा चिंचोळा प्रदेश आहे जो ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडतो. म्हणूनच सिक्कीमवर चीनचा पहिल्यापासून डोळा आहे. जर सिक्कीम चीनने कब्जात घेतला तर ईशान्य भारत कुंठित होईल. तिथे असलेली भारताची फौज अडकून पडेल आणि तिथल्या सामान्य जनतेसाठी खूप मोठे संकट निर्माण होईल. म्हणूनच भारत सिक्कीमच्या संरक्षणासाठी नेहमीच कमालीचा आग्रही असतो. ईशान्य भारत हासुद्धा मध्य आशियाई देशांप्रमाणे खनिजसमृध्द आहे हे साम्य समजून घ्यायला हवे. ही खनिजे अजून untapped आहेत. पण म्हणूनच त्यांचे महत्त्व अधिक आहे.
९) लद्दाखवरही डोळा
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लद्दाखमध्येही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हातापायी झाली. पांगांग तलावाजवळ फिंगर फाईव्ह नावाच्या भागात ही घटना घडली. दोन वर्षांपूर्वीसुध्दा दोन्ही देशांचे सैनिक असेच आमने सामने आले होते. कमांडर पातळीवर चर्चा होऊन वादावर पडदा टाकण्यात आला असला तरी दोन्ही सैन्यांमध्ये परस्परांविषयी प्रचंड संशय कायम आहे.
१०) दुरदर्शी ध्येययुक्त नीती
राज्यशास्त्राचे अभ्यासक ग्रॅहॅम अॅलिसन यांच्या मते चीनने स्वत:पुढे काही उद्दीष्टे ठेवली आहेत. काही टप्पे ठरवले आहेत. २०२५ पर्यंत चीनला तंत्रज्ञानातील महासत्ता व्हायचे आहे. २०३५ पर्यंत चीनला इनोव्हेशन (नवनिर्मिती) मधील महासत्ता व्हायचे आहे. आणि २०४९ पर्यंत चीन जगातील सर्वश्रेष्ठ महासत्ता होऊ इच्छितो. यातल्या वर्षांच्या टप्प्यांकडे बघू नका. उद्दीष्टे लवकर साध्य होत गेली तर ते पुढील लक्ष्याच्या दिशेने अधिक वेगाने प्रवास करतील. पण तरी एकंदर दिशा समजायला हे उपयुक्त आहे. म्हणजे महासत्ता होण्यासाठी तंत्रज्ञान व इनोव्हेशन मध्ये नुसती स्वयंपूर्णता नव्हे तर जवळपास एकाधिकारशाही निर्माण करायची, याची पक्की खूणगाठ चीनने बांधली आहे. त्या दिशेने चीनने फार पूर्वीच घोडदौड सुरू केली आणि आज चायना व्हायरसच्या संकटात वैद्यकीय उत्पादने व तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग चीनवर किती अवलंबून आहे हे लक्षात आले. पण वैद्यकीय क्षेत्र हा तर एकंदर तंत्रज्ञानातील एक भाग झाला. सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाला चीनने डोळ्यापुढे ठेवले आहे.
११) नैसर्गिक साधनसामग्री वर डोळा
कोणत्याही तंत्रज्ञानाच्या उत्पादनासाठी कच्चा माल आणि इंधन आवश्यक असते. त्यामुळेच पृथ्वीवरील खनिजसमृध्द देशांवरचे नियंत्रण कमालीचे महत्त्वाचे ठरते. खनिज तेलाचा वापर फक्त गाडीतील पेट्रोल डिझेल येवढ्या पुरताच नसून त्याचे शेकडो इंडस्ट्रीयल फायदे आहेत. तंत्रज्ञानात प्रगत असलेले देश सोन्याकडे फक्त दागिने करण्यासाठी उपयुक्त म्हणून पाहात नाहीत. अवकाश तंत्रज्ञान आणि सौरऊर्जा या दोन्ही साठी सोन्याचे महत्त्व खूप आहे. कॅन्सरसहीत अन्य काही क्षेत्रात लेझर तंत्रज्ञानासाठी हिर्याचा वापर होतो. लेडचा उपयोग आधुनिक बॅटरीसाठी होतो. युरेनियमचा उपयोग आण्विक तंत्रज्ञानात होतो. अॅल्युमिनियमचा वापर विमान तंत्रज्ञानात होतो.
अशी ही वेगवेगळी उपयुक्त खनिजे मध्य आशिया, दक्षिण चीन समुद्र, ईशान्य भारत इत्यादी ठिकाणी आहेत. त्यावर थेट किंवा अप्रत्यक्ष अंमल बसवून कच्च्या मालाचा अव्याहत पुरवठा करत राहिल्याशिवाय, तसेच शेजारी राष्ट्रांना धाकात ठेवल्या शिवाय चीनला जागतिक महासत्ता होता येणार नाही.
१२) अमेरिका पेक्षा वेगळी नीती
विशेषतः अफगाणिस्तानातून अमेरिकेने केलेली सैन्यकपात चीनला खुणावत आहे. मध्य आशिया प्रमाणेच अफगाणिस्तान सुद्धा खनिजसंपन्न आहे. चीनबाहेरच्या एखाद्या प्रदेशावरचा चीनचा ताबा हा वेगळ्या स्वरुपाचा असेल. त्यांना आवश्यक असलेल्या खनिजे, कारखाने आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी त्यांचा थेट अंमल चालेल. दळणवळण, सप्लाय रुट्स निर्वेध कसे राहतील हे पाहिलं जाईल. बाकी सारी व्यवस्था चीनधार्जिण्या स्थानिक प्रशासनाच्या हाती ठेवण्याचा प्रयत्न होईल. किंवा उत्तर कोरिया आणि पाकिस्तान प्रमाणे देशांची सरकारे मांडलिक बनवली जातील. नेपाळ, श्रीलंका व म्यानमारही त्याच वाटेवर आहेत. तशीच काहीशी अवस्था अफगाणिस्तान व मध्य आशियाची करुन हा प्रदेश चीनच्या अंकीत जरी नाही तरी प्रभावक्षेत्रात आणण्याची धडपड सध्या चालू आहे.
चीनने स्वत:च्या अवतीभवती जे चार हॉटस्पॉट्स तयार करुन ठेवले आहेत ते पुढील प्रमाणे -
१. तैवान
२. उत्तर व दक्षिण कोरिया
३. दक्षिण चीन समुद्र
४. वखान कॉरिडॉर
१३) वखान कॉरिडॉर डोळा
चायनाव्हायरस मुळे जगात जो सार्वत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे त्याचा फायदा घेऊन वरील पाचपैकी किमान एका ठिकाणी चीनद्वारे फोडणी मिळू शकते. या पाचही पर्यायांपैकी वखान कॉरिडॉरची शक्यता मला सर्वात जास्त वाटते. २०११ ला ताजिकीस्तानकडून वखान कॉरिडॉरच्या उत्तरेकडचा भाग मिळवून चीनने खूप आधीच या बुध्दीबळातली एक महत्त्वाची चाल करुन ठेवली होती. वखान कॉरिडॉरचे महत्त्व समजून घ्यायचे तर नकाशा नीट पाहायला हवा. काश्मीर आणि मध्य आशिया यांच्यामध्ये अफगाणिस्तानचा चिंचोळा वखान कॉरिडॉर आहे. कोणे एके काळी रशियन साम्राज्य आणि भारतात स्थापित झालेले ब्रिटिश साम्राज्य यांच्यात करार होऊन ड्यूरंड लाईन आखली गेली. चीन मात्र या करारात नव्हता. कारण तेव्हा जमेस धरावे येवढी चीनची ताकद नव्हती. आणि त्याच पळवाटेचा आधार घेत चीन म्हणतो की त्या करारात आम्ही नव्हतो त्यामुळे हा करार आमच्यावर बाध्य नाही. अफगाणिस्तानची वखान कॉरिडॉरची चिंचोळी पट्टी ही रशियन व ब्रिटिश साम्राज्यात बफर झोनचे काम करुन गेली. पण आता ड्रॅगनला हा बफर झोनच महत्त्वाचे प्रवेशद्वार वाटत असावे.
१४) पाकव्याप्त कश्मीर मध्ये शिरकाव
पाकव्याप्त कश्मीर हा खरे तर भारताचा अविभाज्य भाग. पण पाकिस्तानने तो बेकायदेशीरपणे बळकावला. त्या भागातून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर व ओबीओआर चे प्रोजेक्ट जातात. हे सगळे पाकव्याप्त कश्मीर अर्थात भारताच्या अभिन्न सार्वभौम भूमीतून होत असल्याने भारताने याला वेळोवेळी विरोध केला.
पाकव्याप्त कश्मीर मधून हे प्रकल्प महत्वाच्या टप्प्यावर पोचले म्हणून तर भारताने गेल्या वर्षी त्वरा करत कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्दबातल करुन जम्मू कश्मीर व लद्दाखला केंद्रशासित केलं असावं असे आता वाटत आहे. पुढे उद्भवू शकणार्या गोष्टींसाठी असे करणे आवश्यक ठरले असेल.
पण त्यातूनच पुढचा तार्किक प्रश्न उपस्थित होतो की पाकव्याप्त कश्मीरला भारत कधी सामिल करुन घेणार. म्हणजे आता तज्ञ लोक सुद्धा भारताने पाकव्याप्त कश्मीर नियंत्रणात घ्यावा की न घ्यावा ही चर्चा न करता कधी घेणार यावर बोलत आहेत. जर पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नियंत्रणात आला तर चीनचे फक्त आर्थिक नुकसान होणार नाही तर व्यूहात्मकदृष्ट्या प्रचंड धक्का चीनला बसेल. ओबीओआर प्रोजेक्ट अडचणीत येईल. पण त्याहीपेक्षा वखान कॉरिडॉरच्या दक्षिणेचा हा पाकव्याप्त कश्मीर भारतात आला तर अफगाणिस्तान आणि मध्य आशियाच्या राजकारणात भारताचा चंचूप्रवेश होईल. चीनला मध्य आशियात कोणीही तुल्यबळ स्पर्धक नको आहे.
चीनने चायनाव्हायरसच्या काळात मध्य आशिया, किंबहुना अफगाणिस्तानात कसलीही कुरापत काढू नये म्हणून तर भारत सरकारने हवामान खात्याला पाकव्याप्त कश्मीरचा समावेश त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये व्हावा अशा सूचना देऊन एक मोठी ब्रेकींग बातमी घडवली असू शकते. त्या बातमीचा फोकस वरपांगी पाकिस्तान वाटत असला तरी मुख्य रोख चीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे मध्य आशिया किंवा अफगाणिस्तानात काही कराल तर याद राखा, पाकव्याप्त कश्मीर आम्ही ताब्यात घेऊ, अशी गर्भित धमकी त्यात आहे.
१५) विविध भूप्रदेशावर दाव्याची नीती
Tuotiao.com च्या लेखात म्हटले आहे की खान डायनेस्टीच्या काळात किरगीझस्तान चीनच्या ताब्यात होता. पण हा लेख लिहिणाऱ्या लेखकाच्या बुध्दीची कीव करावी तेवढी थोडी आहे. ज्या खान डायनेस्टीच्या तो बाता मारत आहे ती चेंगीझखान या बिगरचिनी मंगोल वंशीय शासकाची डायनेस्टी आहे. त्या डायनेस्टीतला कुबलईखान हा भलताच हानवंश समर्थक व चीनवादी निघाला. त्याने राजधानी आजच्या बीजिंग येथे हलवली. स्वतःच्या डायनेस्टीचे खान डायनेस्टी हे नाव बदलून युआन डायनेस्टी हा चिनी शब्द त्याने योजला. लेखकाला ह्याच कुबलईखानाच्या काळाचा उल्लेख जरी करायचा असला आणि कुबलईखान किती जरी चीनवादी असला तरी तो होता चेंगीझखानाचा नातू आणि तो होता मंगोल. मग त्या लेखकाच्याच भाषेत बोलायचे तर म्हणावे लागेल की एकेकाळी मंगोल राजांनी चीनवर राज्य केले, तेव्हा चीनने पुन्हा एकदा आपले स्वातंत्र्य मंगोलियाच्या शासकांच्या चरणाशी समर्पित करावे. सगळा चीनच पूर्वी प्रमाणे मंगोलियामध्ये समाविष्ट करुन टाकावा.
या सगळया गोष्टीचा विचार करून भारताने आपली युहरचना केली पाहिजे यासाठी आपला पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी पहिली पाहिजे. असेही कोरोनाने, भूककबळीने, बेकारी, भ्रटाचार, आतंकवाद याने मरण्यापेक्षा नवीन उमेदीने नवीन धोरणाची व अत्येंतिक राष्ट्रवाद, देशाभिमान, स्वदेश, स्व-संक्राती, राष्ट्र-श्रेष्ठम याची गरज निर्माण करणे यासाठी आपल्या संस्कृतीत वारसा पाहणे ही काळाची गरज आहे ।
भारताचा पौराणिक इतिहास
अथर्ववेद, सामवेद वगैरे हिंदुंच्या ग्रंथांमध्ये मध्य आशियाचा उल्लेख आहे. शिवाय बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. तेव्हा चीनने तिबेट भारताला देऊन टाकावा. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन काळी सूर्यवंशीय व चंद्रवंशीय क्षत्रिय राज्यकर्ते राज्य करत होते. ते त्यांच्या वंशाचे संबंध थेट राम व कृष्णा पर्यंत होते असे सांगत. महाभारतात अर्जुन किरात व चिन या हिमालया पलिकडच्या प्रदेशात गेला होता असे उल्लेख आहेत व खुद्द महाभारत युध्दातही चिन व किरात चे सैनिक लढल्याचे उल्लेख आहेत. मग याचा अर्थ मध्य आशिया व चीनच्या काही भूभागावरही भारत दावा सांगू शकतो.
साम्राज्यविस्ताराचा फक्त मनसुबा
त्यानिमित्ताने इथे हे सांगायला हरकत नाही की भारत प्राचीन काळी साम्राज्यविस्तार करत होता. भारतीय हिंदु राजे साम्राज्यविस्तार करत होते. मात्र गेल्या दोन हजार वर्षात अभूतपूर्व आक्रमणे झाल्यामुळे आपल्याला ते जमले नाही. पण म्हणून आपला मूळ पिंड मऊ मेणाहूनी सहनशील वगैरे आजिबात नाही. अटकेपार अगदी खैबरखिंडी पर्यंत राघोबादादा जेव्हा अब्दालीचा पाठलाग करत प्रदेशामागून प्रदेश सोडवत गेले तेव्हा काबूल, कंदाहार, इस्फाहान सुद्धा यथावकाश आपल्या जरीपटक्याच्या टाचेखाली आणण्याचा त्यांचा मानस त्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख सापडतो. पानिपत युद्धात आपला विजय झाला असता तर तो साम्राज्यविस्तार कसाकसा आणि कुठकुठवर झाला असता ह्याची कल्पना नकाशा डोळ्यासमोर ठेवून करा. म्हणजे मध्य आशिया फार लांब नाही हे लक्षात येईल.
अंतिम सत्य महासता हीच नीती असावी
भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.
खूप सुंदर आणि मुद्देसूद मांडणी
ReplyDeleteअगदी सहज शब्दात चीनच्या मनातील भरता विषयी चे धोरण मांडले. याचा तरुण पिढीच्या ज्ञानात भर पडेल.
Delete